ओटावा (कॅनडा) – कॅनडात दोन विमानांची आकाशात टक्कर होऊन एका विमानाचा वैमानिक ठार झाल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. कॅनडाची राजधानी ओटावाच्या पश्चिमेस सुमारे 30 किमी अंतरावर रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. एक छोटे प्रवासी विमान (सेसना) आणि दुसरे एक विमान (टर्बोप्रॉप पायपर पीए-42) यांची टक्कर झाली. सेसना विमान चालवणारा वैमानिक या अपघातात जागेवरच ठार झाला. सेसनामध्ये वैमानिक एकटाच होता, असे ट्रान्सपोर्ट कॅनडाच्या प्रवक्त्याने सांगितले.
दुसऱ्या विमानात वैमानिक आणि काही प्रवासी होते. त्यापैकी कोणालाही काहीही इजा झालेली नाही. पायपर पीए-42 च्या वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राला सांगितले, की सेसना विमानाने खालच्या बाजूने त्याला धडक दिली. पायपर पीए-42 विमानाचा लॅंडिंग गियर बिघडल्याचीही माहिती त्याने सांगितले. पायपर पीए-42 विमानाला ओटावा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाठवण्यात आले. दुर्घटनेचे कारण समजू शकले नाही.