केरला- इंडियन सुपर लीगमधील संघ एक यशस्वी संघ म्हणून केरला ब्लास्टर्सकडे पहिले जाते. परंतु, या मोसमात त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्याचे खापर संघाचे मुख्य कोच डेव्हिड जेम्स यांच्यावर फोडून त्यांना पदावरून हटवण्यात आले. त्यामुळे संदेश जिंघन, सिके विनीथ आणि हालीचरण नाजरी हे स्टार खेळाडू नाराज असून ते जानेवारी ट्रान्स्फर विंडोमध्ये दुसऱ्या संघाशी करारबद्ध होऊ शकतात.
अटलेटिको डी कोलकाता क्लब संदेश जिंघनला संघाशी करारबद्ध करण्यात खूप उत्सुक असून त्यांनी अनेकवेळा हे बोलूनही दाखवले आहे. तर सिके विनीथ या मोसमात भरात नाही. तो 12 सामन्यात 585 मिनिटे मैदानात होता त्यात तयाने फक्त 2 गोल नोंदवले आहेत. त्याच्या या कामगिरीवर तेथील प्रेक्षक खूप नाराज असून विनीथने त्यांना संबोधून एक व्हीडीओ पोस्ट केला होता ज्यामुळे त्याच्यावर आणखी टीका झाली होती. केरळाचा संघ तळातून दुसऱ्या स्थानी आहे त्यामुळे ते अंतिम चार संघात स्थान बनवू शकत नाहीत. हे अन्य एक कारण आहे ज्यामुळे काही स्टार खेळाडू संधी मिळाली की दुसऱ्या संघासाठी करारबद्ध होऊ शकतात.