मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणाऱ्या वैजनाथ पाटील याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला विरोध केल्याने वैजनाथ पाटील याने मुंबई उच्च न्यायालयाबाहेर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला होता. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. आज त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
न्यायालयात मराठा आरक्षणावर झालेल्या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना वैजनाथ पाटील याने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला केला. यावेळी तिथे उपस्थित इतर वकिलांनी त्याला अडवत चांगलाच चोप दिला. हल्ल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना सुरक्षा देण्याचा आदेश दिला.
वैजनाथ पाटील हा जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील मुरमा गावचा रहिवासी आहे. त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून गेल्या चार महिन्यापासून तो नोकरीच्या शोधात होतो.
हल्ला झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी याआधीही आपल्याला धमक्या मिळत असल्याचं सांगितलं होतं. हल्ला होण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आम्ही प्रसारमाध्यमांशी का बोलतो यावर प्रश्न विचारण्यात आला ? यावर आम्हाला एक हजाराहून जास्त धमक्या मिळाल्या आहेत. आमची हत्यादेखील केली जाईल असं आम्ही न्यायालयात सांगितलं. यावर न्यायालयाने दोन्ही पक्षांना अशा प्रकारे धमकावणं चुकीचं असल्याचं सांगितलं.
न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला असता न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला आपलं मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. न्यायालयातील जबाबादार व्यकीतर पक्षपातीपणाचा आरोप करणं चुकीचं आहे असं स्पष्ट केलं होतं.