सांगवी – मुळा आणि पवना नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिकेने जलपर्णी हटवण्याचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी मागणी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मावळ युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सरचिटणीस कुंदन कसबे, चिंचवड अध्यक्ष मयुर जयस्वाल, हिरा जाधव यांनी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी जलपर्णी काढण्याबाबतचे निवेदन देऊनही त्याच्यावर कार्यवाही झाली नाही. जलपर्णी वेळेवर न काढल्याने सांगवीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
डासांनी सांगवीकर त्रासले आहेत. साथीच्या आजारामध्ये वाढ झाली असून आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून होत असलेल्या हलगर्जीपणाचा कार्यकर्त्यांनी निषेध केला. तसेच शुभ मुहूर्त काढण्यासाठी निवदेनासोबत पंचांग भेट देण्यात आले.