मेलबर्न– पर्थ येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आणि भारतीय कर्णधारामध्ये झालेला वाद चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर सामना झाल्यावरही विराटने पेनकडे दुर्लक्ष करत हा वाद संपला नसल्याचे दाखवून दिले होते. मात्र, तिसऱ्या कसोटी पुर्वी टीम पेनने विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळली असून विराटच्या आक्रमकता त्याला आवडत असल्याचे विधान त्याने केले आहे.
दुसऱ्या कसोटी दरम्यान दोन कर्णधार एकमेकांसमोर उभा ठाकल्यानंतर काही माजी खेळाडूंनी यासाठी विराट कोहलीवर टीका केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. दुसऱ्या कसोटी दरम्यान विराटसोबत झालेल्या वादाचा मी आनंद घेत आहे. माझे त्याच्या सोबत कोणतेही वैयक्तिक भांडण नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मी विराट कोहलीच्या फलंदाजीचा चाहता आहे. त्याची फलंदाजीची आक्रमक शैली मला आवडते. त्याच्यामध्ये एक वेगळीच उर्जा आहे. मेलबर्न येथे होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना रंगतदार होईल, असेही पेन यावेळी म्हणाला.
पुढे बोलताना पेन म्हणाला की, विराट कोहली प्रत्येकवेळा जिंकण्यासाठी खेळत असतो. त्याचबरोबर पर्थ कसोटीमध्ये विराटसोबत झालेल्या वादाला विनाकारण इतके महत्व दिले गेले आहे असे मला वाटते. गेल्या काही वर्षांपासून मी विराट कोहलीची फलंदाजी पाहतो आहे. विराट कोहलीची फलंदाजी पहायला मला आवडते. मैदानावर विराट कोहलीसोबत वाद घातल्याचा आनंद घेतोय. मी विराट वर नाराज नाही. विजयासाठी तो सर्वस्व झोकून देणारा खेळाडू आहे. त्याला पराभव नकोसा असतो. तो नेहमी विजयासाठी खेळतो. त्यामुळे त्याची आक्रमकता हा त्याचा स्वभावगुणच आहे. अशी स्तुतीसुमने पेनने विराट कोहलीवर उधळली आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मेलबर्न येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये, कोहली-रहाणे-पुजाराचा अपवाद वगळता अन्य फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीयेत. त्यातच मुंबईकर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संघाबाहेर पडल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे. यावेळी पृथ्वी शॉच्या जागी मयांक अग्रवालला संघात जागा देण्यात आली आहे. याचसोबत हार्दिक पांड्यानेही संघात पुनरागमन केले आहे. तर, रविंद्र जडेजा देखिल जायबंदी असल्याचे विधान रवी शास्त्रीयांनी केले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी भारतीय संघ अदचणींच्या घेऱ्यात अडकला आहे.