तोक्रर्यो- टोकियो येथे 2020मध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडास्पर्धेसाठीच्या अधिकृत “शुभंकर’चे अनावरण काल टोकियो येथे एका शानदार कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ऑलिम्पिकसाठीच्या शुभंकरचे नाव मिराईतोवा आणि पॅरालिम्पिकसाठीच्या शुभंकरचे नाव सोमेइती असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे स्पर्धेसाठी तयार केलेल्या या दोन्ही शुभंकरांच्या चित्रांची निवड जपानमधील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या रचनांमधून करण्यात आली आहे. जपानी भाषेत मिराईतोवा याचा अर्थ भविष्य आणि निरंतरता असा होतो, तर सोमेइतीचा अर्थ इंग्रजीमधील”सो माईटी’ म्हणजे अतिशय प्रचंड असा होतो अशी माहिती यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिली.
या शुभंकारांच्या रचनेसंदर्भात संपूर्ण जपानमधील शाळांमध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामुळे या शाळांमधील मुलांमध्ये आपल्या देशात आयोजित होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेबद्दल उत्साह निर्माण झाला. तसेच स्पर्धेबाबतची पारदर्शकताही या माध्यमातून सर्वांसमोर आली. त्याच बरोबर हे शुभंकर म्हणजे जपानच्या परंपरा, संस्कृती आणि परिवर्तनाचा महत्त्वाचा भाग असल्याचेही र्त्यांनी सांगितले. टोकियो ऑलिम्पिक 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020 या कालावधीत पार पडणार आहे.