- 26 एप्रिल रोजी पुढील सुनावणी
पुणे – प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जामिनावर बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सरकारी पक्षाने युक्तीवाद करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. त्यानुसार 26 एप्रिल रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, तर बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकांत शिवदे काम पाहत आहेत. नागरिकांचा डीएसकेंवर विश्वास आहे. आणखी काही कालावधीची मुदत द्यावी. व्यवसाय पूर्ववत करून सर्वांचे पैसे परत देण्यात येतील. डीएसके हे गुंतवणूकदारांकडून 1989 पासून ठेवी स्वीकारत असून, 2016 पर्यंत व्याज नियमितपणे परत दिले जात होते. ड्रीम सिटी या प्रकल्पासाठी जमीन विकत घेतली होती. त्यासाठी इस्राईल देशातील कंपनीसोबत करार केला होता. मात्र, ती कंपनी अवसायानात निघाल्यामुळे ड्रीम सिटीचे काम थांबले. दरम्यान, 2016 मध्ये अपघात झाला. त्यामध्ये अर्धांगवायू झाल्याने एक वर्ष काम केले नाही. त्यात देशात 2017 मध्ये नोटाबंदी लागू झाली. तसेच जागतिक मंदी आली तसेच सिमेंट आणि स्टीलच्या किंमती वाढल्या आणि कंपनीवर आरिष्ट आले. नागरिकांचा आजही डीएसकेवर विश्वास आहे. त्यांना जामीन द्यावा, आम्ही पुढील सहामहिन्यामध्ये व्यावसाय पूर्ववत करू आणि गुंतवणूकदाराचे पैसे परत देवू. न्यायालयाने आमच्या कामवर निरीक्षण करावे, अशी बाजू बचाव पक्षातर्फे मांडण्यात आली.