मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना थापेबाजी फार काळ चालत नाही, भाजपावर ही वेळ येणारच होती अशी टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मुजोर भाषेला हे उत्तर असल्याचंही ते बोलले आहेत. मी पाच राज्यातील जनतेचं अभिनंदन करतो, त्यांनी यानिमित्त चांगला पायंडा पाडला असं सांगताना पप्पू आता परमपूज्य झाला आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
या निकालांमुळे मी पुन्हा एकदा गुजरातच्या जनतेचे अभिनंदन करेन. कारण त्यांनी पहिल्यांदा मोदींना झटका दिला. गुजरात विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत १६५ वर असणाऱ्या भाजपाला त्यांनी ९९ वरती आणलं. त्यानंतर कर्नाटकात झालं आणि आता तेच या पाच राज्यांत दिसतंय. जुलमी राजवटीला इथल्या जनतेनं चांगली चपराक लावली आहे अशा शब्दांत राज ठाकरेंनी मतदारांचं कौतूक केलं आहे. पुढे ते म्हणालेत की, ‘येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांची ही नांदी आहे. हा पूर्णपणे राहुल गांधींचा विजय आहे. गुजरातमध्येही त्यांनी एकहाती प्रचार केला होता. त्यामुळे पप्पू आता परमपूज्य झाला आहे’.
या देशातील लोकांना किती थापा ऐकायच्या, देशाची परिस्थिती लोकांना माहिती आहे. राजीनामा दिलेले आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेलही काही दिवसांनी बोलतील. त्यांनाही ही मोठ्या धोक्याची घंटा वाटली असेल, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असं राज ठाकरेंनी म्हटलं.
राज्यातही ही वेळ येण्याची शक्यता आहे, कारण फडणवीस सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही. पाडुंरग फुंडकर यांच्या निधनानंतर राज्याला पूर्णवेळ कृषीमंत्री नाही. चंद्रकांत पाटलांवर अतिरिक्त पदभार म्हणून हे काम सोपवलंय. त्याचबरोबर देशात राम मंदिर उभारण्याचे वातावरण नसताना हा भावनेचा मुद्दा काढला जातोय. देशात भाजपा सरकारने काही केलेलच नाही त्यामुळे लोकांसमोर जायचं कसं यासाठी हा उद्योग सुरु आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.