बैरुत (लेबॅनॉन) – एकामागून एक केलेले आत्मघातकी बॉंबस्फोट आणि दहशतवादी हल्ल्यात दक्षिण सीरियात 150 पेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत. स्वीदा शहर आणि त्याच्या जवळची सात गावे यात हे हल्ले करण्यात आले. मानवी हक्क निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी ताबा असलेल्या स्वीदा शहरावर हे हल्ले केंद्रीत होते. इसिस दहशतवाद्यांविरुद्ध रशियाच्या पाठिंब्याने केलेल्या जोरदार कारवाईनंतर आठवडाभराने इसिसचा हा प्रत्युत्तरादाखल हल्ला झाला आहे.
तीन आत्मघातकी इसिस दहशतवाद्यांनी स्वीदा शहराला लक्ष्य बनवले तर स्वीदाच्या उत्तरपूर्वेकडील गावांवर दहशतवाद्यांनी हल्ले करून घरात शिरून नागरिकांना ठार केले, या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या विरोधात लढणारे 94 नागरिक मारले गेले. स्वत:चे आणि गावाचे रक्षण करण्यासाठी या नागरिकांनी शस्त्रे हाती घेतली होती. या चकमकींमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांसह 30 इसिस दहशतवादी मारले गेले आहेत.
बुधवारी झालेला हल्ला हा सन 2011 नंतरचा सर्वात घातकी दहशतवादी हल्ला आहे. हल्ला केलेल्या 7 गावांपैकी 3 गावांवर इसिसने कब्जा मिळवला आहे. सीरियातील यूएन मानवतावादी समन्वयक अली अल झातानी यांनी इसिसच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे,