पुणे – गुरुनानकनगर येथील एका बंगल्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना न्यायालयाने 10 दिवस सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरीक्त सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी हा आदेश दिला.
प्रशांत मच्छिंद्र जाधव (वय 37), शिवाजी बाबासो पाटील (वय 31) आणि ज्ञानेश्वर बडंगर (तिघेरी रा. पंढरपूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई राजेंद्र पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्याचा तपास खडक पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी. एन. राठोड यांनी केला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी 4 साक्षीदार तपासले. 17 ऑक्टोंबर 2007 रोजी रात्री बाराच्या सुमारास खडक पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस शिपाई राजेंद्र पवार हे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना सुत्रांकडून खबर मिळाली की, हिरव्या रंगाच्या मारुती गाडीतून काही व्यक्ती गुरुनानक भागातील एका बंगल्यावर दरोडा टाकण्यासाठी येणार आहे. त्यांनी ही माहिती लगेच पोलीस स्टेशनला कळवली. त्यानुसार तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी. एन. राठोड इतर पोलिसांसह पवार यांनी सांगितलेल्या ठिकाणी आले. राठोड यांनी त्यावेळी परिस्थितीचा आढावा घेतला. आरोपींना पकडण्यासाठी अंधारात दबा धरून बसले. त्यानंतर काही वेळातच खबरीनुसार उल्लेख असलेल्या व्यक्ती मारुती गाडी घेवून घटनास्थळी आल्या. पोलिसांनी व्हॅन आडवी घालून त्यांना अडवले. पोलीस आल्याचे पाहून चोरांच्या गाडीतील तिघे अंधारात पळाले, तर दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे दरोड्यासाठी लागणारे साहित्य आढळले. दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी इतर आरोपींची नावे सांगितले. सर्व आरोपी दरोडा टाकण्यासाठी पंढरपूरहून पुण्यात आले होते. तपासादरम्यान तिसया आरोपीला अटक करण्यात आली होती.
