बॉलिवूडमध्ये सध्या थ्रिलर आणि बायोपिक सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. प्रेक्षकांची आवड पाहता आता दिग्दर्शक शिवमनेही मर्डर मिस्ट्री असलेला एक चित्रपट आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या नावाचीच चर्चा सुरू आहे.
शशी थरूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही वर्षांतच सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली. त्यांचा मृतदेह दिल्लीतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये सापडला होता. सध्या या खुनाचा खटला दिल्ली न्यायालयात सुरू आहे. या चित्रपटात शशी थरूर यांची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्यापही उघड झालेले नाही.
दीपिकाच्या आयुष्यातील वैवाहिक टप्प्याला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे. गेल्या दशकभरापासून तिने सिनेसृष्टीत अनेक यादगार भूमिका साकारल्या आहेत. कोणीही गॉडफादर नसताना तिने केलेला प्रवास कौतुकास्पद आहे. वडील बॅडमिंटनपटू असताना सिनेसृष्टीत पाय रोवून उभे राहणे ही सोपी गोष्ट नव्हती. मॉडेलिंगसाठी प्रयत्न करायचे म्हणून दीपिका जेव्हा पहिल्यांदा मुंबईला गेली होती, तव्हा तिच्या घरच्यांना कित्येक दिवस झोप लागलेली नव्हती, असे खुद्द प्रकाश पदुकोण यांनीच सांगितले आहे. याच मॉडेलिंग करिअर दरम्यान फराह खानने दीपिकाला बघितले आणि तिचे भाग्य उजळले. आता तिच्या आणि रणवीर सिंहच्या विवाहाची तयारी जोरात सुरू आहे. वेडिंग डेस्टिनेशन इटली असल्याचेही समजते आहे. विवाह समारंभासाठी दीपिकाच्या वेशभूषेची रचना प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सव्यसाची करत आहेत. प्रियांका आणि निक यांचाही विवाह याच दरम्यान होण्याची शक्यता आहे. दोन्ही जोड्यांचे रिसेप्शन एकाचवेळी ठरले तर बॉलिवूड सेलिब्रिटीजना कोठे जावे हा प्रश्न पडू शकतो. म्हणून दीपिकाने प्रियांकाशी बोलून रिसेप्शनची तारीख ठरवल्याचेही समजते आहे.