- सरकारचा पळपुटेपणा : अजित पवार यांची सरकारवर टीका
पुणे – राज्यातील दुष्काळावर उत्तरे देण्याची “धमक’ या सरकारमध्ये राहिलेली नाही, म्हणूनच हिवाळी अधिवेशनाचा कामकाजाचा वेळ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सरकारचा पळपुटेपणा असल्याची खरमरीत टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली आहे. त्यामुळे यावेळच्या अधिवेशनात दुष्काळावरून चांगलेच “रान’ पेटणार असल्याचे दिसून येते.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर अजित पवार यांना अधिवेशनाचा काळ कमी केला आणि राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळजन्य तालुक्यांच्या यादीबाबत विचारणा केली असता, त्यांनी सडेतोड शब्दात सरकारचा समाचार घेतला. राज्यात भविष्यात दुष्काळाची भयान स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. असे असताना य दुष्काळाला तोंड देताना कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे, कशा पद्धतीने त्याला तोंड द्यायचे याबाबत सखोल चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, या दुष्काळाची झळ या सरकारला अद्याप बसली नसून, त्याचा अंदाजही अजून आला नाही.
दरम्यान, अधिवेशनाचा काळ अधिक असता तर जनतेलाही सभागृहातील सर्व गोष्टी दिसल्या असत्या. राज्यात भयान दुष्काळाची भीती असताना, त्यावर जास्त चर्चा होवू नये यासाठी अधिवेशनाचा काळ कमी करण्यात आला आहे. मात्र, हा सरकारचा पळपुटेपणा आहे. कोणत्याच गोष्टीवर बोलण्यासाठी सरकार जनतेसमोर किंवा लोकप्रतिनिधींसमोर येण्यास तयार नाही. सभागृहाचा काळ जास्त राहिला तर विरोधक दुष्काळावरून अनेक प्रश्न विचारतील, अशी भीती असून, त्या प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांच्यामध्ये “धमक’ राहिली नाही असेच यावरून दिसून येत असल्याची टीका पवार यांनी यावेळी केली.