- शिवसेनेची भूमिका; मित्रपक्ष भाजपवर साधला निशाणा
- शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार मानत असल्याचेही केले स्पष्ट
मुंबई – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. त्याची कुणी टर उडवू नये, असे म्हणत शिवसेनेने मित्रपक्ष भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाल्यास पंतप्रधानपद स्वीकारण्यास तयार असल्याचे राहुल यांनी मंगळवारी म्हटले. त्यावरून भाजपने त्यांची टर उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल यांची खिल्ली उडवली.
यापार्श्वभूमीवर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना राहुल यांच्या भूमिकेचे समर्थन केले. लोकशाहीत राहुल यांना पंतप्रधानपदाची आकांक्षा जाहीर करण्याचा अधिकार आहे. या अधिकारामुळेच मोदी पंतप्रधान बनले. खरेतर, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पंतप्रधान बनावे अशी भूमिका अनेकांनी 2014 मध्ये घेतली होती. राहुल यांचा पराभव करा आणि त्यांना पंतप्रधान बनण्यापासून रोखा. त्यांच्या भूमिकेमुळे अस्वस्थ बनण्याचे काहीच कारण नाही, असे राऊत म्हणाले.
राहुल यांच्या भूमिकेबाबत कॉंग्रेसचे मित्रपक्ष निर्णय घेतील. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा योग्य उमेदवार मानतो. मोदी, आडवाणी, अरूण जेटली यांच्यात प्रत्येकामध्ये क्षमता आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.