मुंबई – बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू कराव्यात आणि चारा उत्पादन करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनांचा तसेच जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे, मागेल त्याला शेततळे आदींच्या योजनांचा आढावा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी टंचाई निधीतून वीजदेयकांची रक्कम अदा करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव डी. के. जैन, मदत व पुनर्वसनच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल, पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी तसेच चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन राज्यातील सुमारे एक लाख ४० हजार हेक्टर गाळपेर जमिनींवर चारा उत्पादन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या तालुक्यात दुष्काळी स्थिती नाही, अशा ठिकाणीही चारा उत्पादन घेण्यात यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.