- एमईए फुटबॉल लीग स्पर्धा
पुणे – पुरुष गटात रेड डेव्हिल्स संघाने, तर महिला गटात दिवा डॉमिनेटर संघाने विजेतेपद संपादन करताना मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित एमईए फुटबॉल लीग स्पर्धेवर वर्चस्व गाजविले.
व्हिजन स्पोर्टस् अकादमी येथील मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटातील अंतिम फेरीत रेड डेव्हिल्स संघाने रियल ऍटॅकर्स संघाचा 3-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यात सुरुवातीपासून रेड डेव्हिल्स संघाने जोरदार चढायांना प्रारंभ केला. तिसऱ्या मिनिटाला आकाश ढोणे याने गोल करून संघाचे खाते उघडले. पण दोनच मिनिटांनी रियल ऍटॅकर्सच्या ऋषभ खैरेने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 10व्या मिनिटाला ऋषभ खैरेने आणखी एक गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली.
पूर्वार्ध संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना रेड डेव्हिल्सच्या अनिकेत हेलुडेने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात रेड डेव्हिल्स संघाने आपली आक्रमणाची धार अधिक तीव्र केली. 18व्या मिनिटाला अनिकेत हेलुडेने चेंडूवर ताबा मिळवत गोल करून संघाला 3-2अशी विजयी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या शेवटपर्यंत आपली आघाडी कायम राखत रेड डेव्हिल्सने रियल ऍटॅकर्सवर 3-2 अशा फरकाने विजय मिळवला.
महिला गटातील अंतिम फेरीत दिवा डॉमिनेटर संघाने लेडी हॉकर्स् संघाचा 3-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत दिवा डॉमिनेटर व लेडी हॉकर्स् यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये दिवा डॉमिनेटरकडून मौसमी कोटकर, सायली काळे, सायली हेलुडे यांनी गोल केले. तर लेडी हॉकर्सच्या पूजा चोरगे, दक्षता वाघ, हेमांगी हेलुडे यांना गोल मारण्यात अपयश आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सीजीएसटी, पुणे विभागाचे सहआयुक्त हेमंतकुमार तांतिया (आयआरएस), भारतीय फुटबॉलपटू परेश शिवलकर आणि लौकिक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमईएचे अध्यक्ष अंकुश असबे, सेक्रेटरी प्रमोद साठे, स्पोर्टस् कमिटीचे महेश भागवत, राजेश कुर्हाडे, सागर तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतल कोकाटेने केले.
सविस्तर निकाल-
पुरुष गट- अंतिम फेरी – रेड डेव्हिल्स- 3 (आकाश ढोणे 3मि., अनिकेत हेलुडे 12, 18मि.) वि.वि. रियल अटॅकर्स- 2 (ऋषभ खैरे 5, 10मि.)
महिला गट- अंतिम फेरी – दिवा डॉमिनेटर- 3 (मौसमी कोटकर, सायली काळे, सायली हेलुडे) टायब्रेकरमध्ये वि.वि. लेडी हॉकर्स- 2 (नीतल कोकाटे, वृषाली तुपे); पूर्ण वेळ: 0-0; इतर पारितोषिके – गोल्डन बूट – रिषभ खैरे (11 गोल), उत्कृष्ट गोलरक्षक- हर्षवर्धन तुपे; फेअर प्ले विजेता संघ- स्पार्टन रायडर्स.