भांडी आणि सोने पॉलिश करून देण्याच्या निमित्ताने दोन महिलांना गुंगारा देऊन १० तोळे सोने घेऊन दोन चोरटे पळून गेले. वाडा येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
वाडय़ातील राम मंदिराजवळ वैभव गंधी यांच्या घरात दुपारी विना गंघे आणि त्यांच्या सासू दोघी एकटय़ाच घरात होत्या. तांब्याची भांडी पॉलिश करून देतो, असे सांगून दोघे जण त्यांच्या घरात शिरले. भांडी स्वच्छ करून दाखवत असताना सोनेही पॉलिश करून देतो, असे सांगत दोघांनी वैभव गंधी यांच्या आईला विश्वासात घेतले. त्यांच्या हातातील पाच तोळय़ाच्या सोन्याच्या बांगडय़ा आणि पाच तोळय़ाचे गंठन काढून घेतले. दोघींनी आपली कामे करा, तोपर्यंत दागिने पॉलिश करून देतो, असे त्यांनी सांगितले. दोघी स्वयंपाकघरात काम करण्यासाठी गेले असता दोघांनी तात्काळ तेथून पळ काढला. या दागिन्यांची किंमत तीन लाख रुपये होती.
वाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.
चार महिन्यांपूर्वी वाडा शहरातील भानुशाली आळी येथील नितीन भानुशाली यांच्या घरात शिरून चोरटय़ांनी अशाच प्रकारे सोने लंपास केले होते.