- तिसरी एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धा
पुणे- फिनआयक्यू, सनगार्ड एएस, सायबेज व केपीआयटी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला. राजेश वाधवान समूह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटीतर्फे आणि नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्स, रॅडिसन ब्लू (हिंजेवाडी) यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे.
मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपान्त्यपूर्व फेरीत पहिल्या सामन्यात प्रकाश थोरातने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर फिनआयक्यू संघाने कॅपजेमिनी संघाचा 4-0 असा सहज पराभव केला. दुसऱ्या लढतीत सनगार्ड एएस संघाने ऍमडॉक्सचा 4-1 असा पराभव केला. विजयी संघाकडून याकुब पिरजादे, क्रिशॉल फर्नांडिस, रोमिओ अरुलदास, योगेश यादव यांनी प्रत्येकी एक गोल केला.
तिसऱ्या लढतीत सायबेज संघाने कनव्हर्जीज संघाचा 2-1असा संघर्षपूर्ण पराभव करून उपान्त्य फेरी गाठली. तर चुरशीच्या लढतीत केपीआयटी संघाने इन्फोसिसचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव करून उपान्त्य फेरीत धडक मारली. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला व त्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये केपीआयटीकडून हेमराज हुडा, प्रसाज सूर्यवंशी, प्रणव सिद्धेश्वर यांनी गोल केले, तर इन्फोसिसकडून सतीश बनसोडे, सुनील मेहता, विवेक नायर यांना गोल मारण्यात अपयश आले.
सविस्तर निकाल-
उपान्त्यपूर्व फेरी – फिनआयक्यू- 4 (प्रकाश थोरात 2 व 5वे मि., श्रीकांत मोलनगिरी 12वे मि., वैष्णव शर्मा 20वे मि.) वि.वि. कॅपजेमिनी- 0; सनगार्ड एएस- 4 (याकूब पीरजादे तिसरे मि., क्रिशॉल फर्नांडिस सहावे मि., रोमिओ अरुलदास 10वे मि., योगेश यादव 15वे मि.) वि.वि. ऍमडॉक्स- 1(अविरल जैन 12मि); सायबेज- 2 (आरिफ चितेवान आठवे मि., आशिष मगर 13वे मि.)वि.वि.कनव्हर्जीज- 1 (लुईस रेमेई चौथे मि.); केपीआयटी- 3 (हेमराज हुडा, प्रसाज सूर्यवंशी, प्रणव सिद्धेश्वर, गोल चुकविले-अल्बी अब्राहिम) टायब्रेकरमध्ये वि.वि.इन्फोसिस- 1 (विल्सन लोबा, गोल चुकविले-सतीश बनसोडे, सुनील मेहता, विवेक नायर); पूर्ण वेळ- 0-0.