- निवडणुकीचा आज निकाल, शेख हसीना यांना विजयाची खात्री
बांगलादेशमध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीस हिंसाचाराचे गालबोट लागले. मतदानादरम्यान देशभरात झालेल्या हिंसाचारात १७ जण ठार झाले. निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा विराजमान होण्यासाठी इच्छुक असलेल्या शेख हसीना यांचा सत्तारूढ अवामी लीग आणि माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष यांच्यात ही लढत होत आहे. सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. आठ तासांचे मतदान नियोजित वेळेनुसार संपले असून, आता मतमोजणीची तयारी सुरू आहे, असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. संसदेच्या ३०० जागांपैकी २९९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १,८४८ उमेदवार रिंगणात होते. पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका येथे मतदान केले. तिथे त्यांचे नातेवाईक फजल नूर तपोश हे उमेदवार आहेत. ‘‘मला विजयाची खात्री आहे. लोकांवर माझा विश्वास असून ते आम्हालाच निवडून देतील’’, असे त्यांनी मतदान केल्यानंतर सांगितले.