नवी दिल्ली – पतंजली परिधान या पतंजलीच्या कपड्यांच्या पहिल्यावहिल्या शोरूमचे उद्घाटन बाबा रामदेव यांनी केले आहे. डिसेंबरपर्यंत देशात अशीच 25 शोरूम उभारण्यात येणार असल्याचे बाबा रामदेव यावेळी म्हणाले.
पतंजलीच्या या शोरूममध्ये पारंपरिक पोशाखासोबतच पाश्चिमात्य पद्धतीचे कपडेही मिळणार आहेत. तसेच ग्राहकांना याठिकाणी दागिने आणि इतर गोष्टीही खरेदी करता येणार आहेत.
सध्या याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जीन्सची किंमत 1100 रुपये असून दिवाळीच्या निमित्ताने 25 टक्के सूट देण्यात येणार आहे. याठिकाणी पुरुष, स्त्रिया, लहान मुले, डेनिम, पारंपरिक, कॅज्युअल, फॉर्मल अशा सर्व प्रकारचे 3000 कपड्यांचे प्रकार उपलब्ध असल्याचे पतंजलीकडून सांगण्यात आले आहे. ज्याप्रमाणे खादीने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले होते. त्याचप्रमाणे पतंजली देशात आर्थिक स्वातंत्र्य आणेल असे त्यानी म्हटले आहे.
याआधी पतंजलीचे कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्णन यांनी जीन्सबाबत महत्त्वाचे विधान केले होते. जीन्स ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. विदेशी गोष्टींच्या वापराबाबत आपण दोन गोष्टी करू शकतो. एकतर त्याचा बहिष्कार करणे अन्यथा आपल्या पद्धतीने त्याचा स्वीकार करणे. सध्या जीन्स लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याचा बहिष्कार करणे शक्य नसल्याने आपण त्यांना स्वदेशी बनविणे गरजेचे आहे, असे त्यानी सांगितले.