सिंगर नेहा कक्कड आणि अॅक्टर हिमांश कोहली यांच्यात काही दिवसांपूर्वी “ब्रेक अप’ झाला आहे. या “ब्रेक अप’मुळे नेहा कक्कड फारच दुखावली आहे. तिने आपले दुःख सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांशी शेअर केले होते. “ब्रेक अप’च्या वेदना व्यक्त करताना तिला अश्रूही अनावर झाले होते. हा अनुभव तिच्यासाठी खूपच त्रासदायक ठरला. “इंडियन आयडल 10’च्या सेटवरही याचा अनुभव आला. एका स्पर्धकाने एक इमोशनल गाणे गायले. ते ऐकून नेहाला आपल्या भावना रोखून धरणे शक्य झाले नाही. तिच्या डोळ्यांमधून घळाघळा अश्रू वाहायला लागले होते. हे बघून सेटवर सगळेच थोडेसे धास्तावले होते. एक प्रकारचा अनामिक तणाव वातावरणात निर्माण झाला होता. नेहाला सावरण्यासाठी तिच्याशी बोलण्याचेही कोणाला धाडस झाले नाही. थोडा वेळ एकटीला राहू दिल्यावर ती स्वतःच सावरली. मात्र नेहाच्या या ऑफ मूडमुळे या एपिसोडचे काही शूटिंग रिशूट केले गेले.
या प्रसंगानंतर आता ती सावरण्याचा प्रयत्न करते आहे. बॉयफ्रेंड हिमांश कोहलीबरोबर असलेले आपले नाते विसरण्याचा ती प्रयत्न करते आहे. “ब्रेक अप’चे नक्की कारण काय, असे तिला विचारण्याचा प्रयत्न झाला असता तिने हिमांशला चक्क ओळखण्यासही नकार दिला आहे. “कोण आहे हा हिमांश कोहली. मी कोणालाही ओळखत नाही.’ असे ती म्हणाली.
“इंडियन आयडल 10’च्या सेटवरच नेहा आणि हिमांश यांची घट्ट मैत्री झाली होती. त्यांच्यात डेटिंगही सुरू झाले होते. यांच्यातील केमिस्ट्री खूप रंगात आली आहे, असे समजत असतानाच एक दिवस अचानक काही दिवसांपूर्वी नेहाने इन्स्टाग्रामवर हिमांश कोहलीला “अनफॉलो’ केले होते. तिने इन्स्टाग्रामवरून हिमांश कोहलीचे सर्व फोटोही डिलीट करून टाकले होते. त्यानंतरच या दोघांमध्ये “ब्रेक अप’ झाल्याच्या बातम्या वेगाने पसरल्या होत्या. मात्र या दोघांमध्ये नक्की काय बिनसले आहे, हे अद्याप कोणाकडूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही.