- भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
भोसरी-तळवडेमधील काही भाग, कृष्णानगर, मोशी, संतनगर, दिघी, इंद्रायणीनगर या भागात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना राबविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी संबधित अधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदार यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीसाठी आमदार महेश लांडगे, सह शहर अभियंता आयुब पठाण, सेक्टर 23 चे प्रमुख कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, ई व क प्रभाग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, संबंधित कामाचे ठेकेदार, नगरसेविका निर्मला गायकवाड, विकास डोळस, विकास गोरडे, लक्ष्मण सस्ते, संजय नेवाळे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, सोनाली गव्हाणे, संतोष लोंढे, भीमाबाई फुगे, स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते.
नागरिकांना 24×7 पाणी मिळण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या घरात नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. या योजनेचे काम सध्या संथगतीने सुरु असल्याची तक्रार आल्यानंतर आमदार लांडगे यांनी संबधित अधिका-यांसोबत ही बैठक घेतली. प्रभागातील नगरसेवक प्रभागातील सुरु असलेल्या कामांना सहकार्य करत नसल्याची तक्रार ठेकेदारांनी लांडगे यांच्याकडे केली होती. त्यावर लांडगे यांनी तोडगा काढत, यापुढे आपल्या प्रभागातील सर्व नगरसेवक स्वतः कामाच्या ठिकाणी हजर राहून कामे करून घेतील, असे आश्वासन दिले.
आमदार महेश लांडगे म्हणाले, येत्या एक ते दोन आठवड्यात दिघी मधील सर्व घरांमध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत नळ कनेक्शन जोडून देण्यात येणार आहेत. कृष्णानगर, मोशी,संतनगर, दिघी या भागात काही कामांना विलंब होत आहे. ती कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. ज्या घरांमध्ये जुने कनेक्शन आहे, ते बदलून नवीन कनेक्शन देण्यात येईल. ज्या ठिकाणी पाण्याची लाईन नाही, अशा ठिकाणी नवीन लाईन टाकण्यात येणार आहे. या कामांसाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, नगरसेवकांसह मी स्वतः प्रयत्नशील आहे.