नवी दिल्ली – युगांडासह आफ्रिकेतील सर्वच देश भारतासाठी महत्वाचे आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. वसाहतवादाविरुद्धच्या लढ्याचा इतिहास, मोठ्या प्रमाणावरील भारतीय समुदाय आणि विकास प्रक्रियेतील समान आव्हाने ही साम्य स्थळे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी युगांडा येथील भारतीय समुदायाला संबोधित केले. कंपाला येथे आयोजित या कार्यक्रमाला युगांडाचे राष्ट्रपती मुसेवेनी सुद्धा उपस्थित होते. यानंतर युगांडाच्या संसदेलाही पंतप्रधानांनी संबोधित केले.
भारत आणि युगांडामधील संबंध कित्येक शतके जुने आहेत. दोन्ही देशांना जोडणारे समान ऐतिहासिक दुवे असल्याचे सांगत, वसाहत वादाविरुद्धचा लढा आणि युगांडामधील रेल्वे बांधणीच्या कामाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. युगांडाच्या राजकारणातही काही भारतीय महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या समारंभात सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून युगांडामधील भारतीय समुदायाचे भारतीयत्व अधिक प्रकर्षाने अधोरेखित होते, अशी कौतुकाची भावना त्यांनी व्यक्त केली.
परराष्ट्र धोरणात आफ्रिकेला महत्व…
भारताच्या परराष्ट्र व्यवहारविषयक धोरणात आफ्रिकेचे महत्व आहे. या संदर्भात नवी दिल्लीमध्ये 2015 साली आयोजित भारत-आफ्रिका मंच परिषदेचा त्यांनी उल्लेख केला. तीन दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मुल्याचे लाईन्स ऑफ क्रेडिट प्रकल्प, शिष्यवृत्ती, ई-व्हिसा सुविधा या उपक्रमांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या देशांच्या सदस्यांमध्ये निम्यापेक्षा जास्त सदस्य आफ्रिकेचे असल्याचे त्यांनी सांगितले.