किगाली (रवांडा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेचे दोन दिवसांच्या रवांडा दौऱ्यावर गेले आहेत. ते रवांडाला पोहचण्यापूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग़ यांनी रवांडाला भेट दिली होती. रवांडा-ज्याला गेट वे ऑफ़ आफ्रिका म्हंणतात-त्यासाठी भारत आणि चीनची स्पर्धा चालली आहे. त्यासाठी भारत-चीनमध्ये शीत युद्ध चालू आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. रवांडा मात्र भारत-चीनशी समतोल साधून आपला फायदा साधत आहे.
चीनचे एक धोरण आहे. कोणत्याही परिस्थितीत चीन भारताला आपल्या पुढे जाउ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रवांडाला कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या वर्षीही भारताने रवांडाला 12 कोटी डॉलर्सचे कर्ज दिले होते. कर्ज देण्याच्या बाबत भारतने चीनला पछाडले असले, तरी चीनने रवांडातील 70 टक्के रस्ते निर्माण केले आहेत. इतकेच नाही, तर 12 वर्षात 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
रवांडा आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. रवांडात नैसर्गिक साधनसंपत्ती नसली, तरी आफ्रिकेतील अन्य देशांबरोबर व्यापारवृवृद्धीसाठी रवांडाचे भौगोलिक स्थान महत्त्वपूर्ण आहे. 55 देशांच्या आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष रवांडाचे राष्ट्रपती पॉल कगामे निवडले गेले आहेत. म्हणूनच रवांडाला गेट वे ऑफ आफ्रिका किंवा आफ्रिकी देशांबरोबरचा व्यापार वाढवण्याची किल्ली मानले जाते.आणि त्यासाठीच चीन आणि भारताचे शीतयुद्ध चालू आहे.