हिमाचल प्रदेशात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा घेणाऱ्या साडे आठ लाख कुटुंबांशी भाजपा ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ या मोहिमेंतर्गत संपर्क साधणार आहे. या लाभार्थ्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावण्याच्या तसेच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाला पाठींबा मागण्यात येणार आहे.
भाजपाने मंगळवारी ‘मेरा परिवार, भाजपा परिवार’ या देशव्यापी मोहिमेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत भाजपाला ५ कोटी सदस्य आणि समर्थकांना आपल्या घरावर भाजपाच्या समर्थनार्थ झेंडा लावावा लागणार आहे. २ मार्चपर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे.
हिमाचल प्रदेशात भाजपा या मोहिमेद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचे समर्थन मिळवण्यासाठी आक्रमक पद्धतीने तयारीला लागली आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंह यांनी म्हटले की, हिमाचल प्रदेशात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा साडे आठ लाख लोकांना फायदा मिळाला आहे. आगामी काळात आमचे कार्यकर्ते या सर्व साडे आठ लाख कुटुंबांकडून लोकसभेसाठी समर्थन मिळावे यासाठी संपर्क साधणार आहेत. यावेळी त्यांना भाजपाला समर्थन जाहीर करण्यासाठी आपल्या घराच्या छतावर भाजपाचा झेंडा लावण्याच्या सूचना करणार आहोत.
दरम्यान, भाजपाच्या या मोहिमेवर विरोधीपक्ष नेते मुकेश अग्निहोत्री यांनी टीका केली आहे. हा लाजिरवाणा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपा इतक्या खाली घसरला आहे ज्या योजना सरकारी पैशांनी चालतात त्याचा राजकीय फायदा घेत आहे. हा उघडउघड सरकारी पैशाचा दुरुपयोग आहे.