- पाच पुरस्कारांनी गौरव : “समान पाणी’साठीही पालिकेचा सन्मान
पुणे- केंद्र सरकारच्या वतीने स्मार्ट सिटींसाठी दिलेल्या पुरस्कारांपैकी चार पुरस्कार पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) पटकावले आहेत. तर पुणे महापालिकेला समान पाणी पुरवठा योजनेसाठी काढण्यात आलेल्या “म्युनिसीपल बॉन्ड’ संकल्पनेसाठी गौरविण्यात आले. तर स्मार्ट सिटीला स्मार्ट प्लेसमेकिंग, लाईटहाऊस, स्मार्ट पब्लिक बायसिकल शेअरिंग आणि “पीएमसी केअर’ या प्रकल्पांसाठी गौरविण्यात आले आहे.
लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते महापौर मुक्ता टिळक आणि पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
यावेळी माजी आयुक्त आणि स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यांनी हे महापालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी कुलकर्णी, लाईट प्रकल्पाचे समन्वयक गणेश सोनुने उपस्थित होते.
स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना आणि पंतप्रधान आवास योजनेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मंत्रालयाकडून मूल्यांकन, परिमाणांनुसार कामाचे प्रमाणीकरण आणि परीक्षण करून मूल्यांकन प्रक्रियेद्वारे या पुरस्कारांसाठी या निवडी करण्यात आल्या.
राष्ट्रीय पातळीवर 11 पैकी 4 पुरस्कार मिळवून पुणे शहराने पुन्हा सर्वोत्तम कामगिरी केली आहे. स्मार्ट सिटी होण्यामध्ये अधिक चांगले जीवनमान, लवचिकता ठेवत पुणे वाटचाल करत आहे, याचा हा प्रत्यय आहे. यामुळे पुणेरीपण जपत स्मार्ट सिटी मिशनचे ध्येय गाठण्यासाठी काम करण्याचा उत्साह वाढला आहे. प्रकल्पांना नियमित पाठिंबा दर्शवणाऱ्या पुणेकरांच्या विश्वासाची पावती आहे.
– डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी.
या पुरस्कारांमुळे पुणे शहराला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. पुणेकर आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी हे पुरस्कार प्रेरणादायी आहे. या पुरस्कारांमुळे आणखी जोमाने आणि उत्साहाने काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळते.
– मुक्ता टिळक, महापौर.