भगवान हनुमान हे दलित असल्याचा उल्लेख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केल्यापासून सुरु झालेला वाद शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. काहींनी हनुमान हे वनवासी, जाट, ब्राह्मण, मुसलमान होते असाही दावा केला. भाजपाचे बंडखोर खासदार किर्ती आझाद यांनी तर हनुमान हे चिनी होते, असेही म्हटले होते. या सर्वांनी यामागे आपला तर्कही नोंदवला होता. आता यामध्ये आणखी एका भाजपा नेत्याचे नाव जोडले गेले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांनी यात उडी घेतली आहे. हनुमानजी एक खेळाडू होते. त्यांच्या जातीबाबत चर्चा केली जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

हनुमान खेळाडू होते, भाजपा मंत्र्याचे नवे वक्तव्य
तर दुसरीकडे, हनुमानांच्या जाती-धर्मावरुन भाजपा नेत्यांकडून होत असलेल्या शेरेबाजीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी निशाणा साधला. हिंदू देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपा नेत्यांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच आखाडा परिषदेसारख्या संघटनांनी कोणताच संबंध ठेवला नाही पाहिजे. या लोकांवर सार्वजनिकरित्या टीका करायला हवी. आम्ही हनुमानजींना भगवान शंकराचा अवतार मानतो. परंतु, भाजपा नेते हनुमानजींना जाती-धर्मांमध्ये ओढत आहेत. ते कोणत्या धर्माचे पालन करत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला ?