लखनौ- हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला ब्रम्होस प्रकल्पातील एरोस्पेस इंजिनियर निशांत आगरवाल याला येथील विशेष न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाच्यावतीने त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. उत्तरप्रदेश व महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकांनी संयुक्तरित्या कारवाई करून त्याला ब्रम्होस प्रकल्पाच्या नागपुरातील कार्यालयातून अटक केली होती. त्याने या क्षेपणास्त्राची तांत्रिक माहिती पाकिस्तानला पुरवली होती. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी लखनौला नेण्यात आले आहे.
काल त्याच्या संबंधात झालेल्या सुनावणीच्यावेळी त्याच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की निशांत हा एक तरूण अभियंता असून त्याला कट करून या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. तथापी त्यांच्या आक्षेपाला तपास यंत्रणांच्यावतीने जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्याने फेसबुकवरूनही माहिती पुरवली होती व त्याच्या लॅपटॉप मध्ये ब्रम्होसची अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती साठवण्यात आली होती. ती सारी माहिती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. त्याचा तपशील तपास अधिकाऱ्यांच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात आला. पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या हस्तक असणाऱ्या फेसबुक वरील दोन अकाऊंटच्या तो संपर्कात होता. ही अकाऊंट्स नेहा शर्मा आणि पुजा रंजन या नावाने कार्यरत आहेत. ब्रम्होस हे क्षेपणास्त्र रशियाच्या मदतीने भारतात तयार केले जात आहे.