एका लढव्या तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली !!!
जेष्ठ समाजवादी नेते,माजी गृहराज्य मंत्री, समाजवादी पार्टी (इं) चे संस्थापक – राष्ट्रीय प्रमुख आदरणीय भाई वैद्य (वय वर्ष ९०) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले. भाईनी पुण्याचे नगरसेवक, महापौर ते महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री असा राजकीय प्रवास करीत असताना आपला समाजवादी विचार कधीच सोडला नाही. त्यांनी कधीच जाती-पातीला थारा न देता, अखंड आयुष्यभर एका सरळ रेषेत चालून गोरगरिबांना, वंचितांना आणि कष्टकऱ्यांना आधार दिला. आयुष्यात भाईनी अनेक संकटे पाहिले आणि त्याच्याशी चार हात कसे करायचे याची प्रेरणा म्हणजे भाई. तरुणालाही लाजवेल असे काम भाई आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थीपणे जनसामान्यांसाठी, तळागळातील जनतेसाठी करीत राहिले तसेच भाईनी संपूर्ण जीवनात आपल्या तत्वांशी आणि समाजवादी विचारांशी कधीही तडजोड केली नाही त्यामुळे भाईना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात मानणारा एक वर्ग आज खरच पोरका झाला. त्यांनी जनमाणसांसाठी आणि त्याच्या हक्कासाठी मोर्चे, सत्याग्रह, धरणे तसेच विविध सामाजिक प्रश्नांना आंदोलनाव्दारे वाचा फोडली. त्यांची वैचारिक बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि जीवनातील संघर्ष हा भाईच्या रूपाने कायम स्मरणात राहील. परंतु भाईच्या जाण्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात तयार झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. असा साधा, सरळ, सज्जन माणूस होणे नाही.
– गणेश थोपटे (B.Sc., M.C.A.), वृत्तपत्रविद्या पदविका (रानडे)