महेशदादा सोशल फाउंडेशनतर्फे मार्गदर्शन शिबीर
पिंपरी – भारत देशाला राष्ट्रप्रेमी युवकांची गरज आहे. आपण तंत्रज्ञानात विलक्षण प्रगती केली. आता बी.टेक, एम.टेक. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर देशसेवा करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आहे. त्यामुळे नौदलात सहभागी होवून देशसेवा करा, असे अवाहन निवृत्त कमांडर जयंत एस. कोंडे यांनी केले.
भारतीय नौदलातील विविध संधींबाबत तरुण आणि उच्चशिक्षीतांना मार्गदर्शन व्हावे. यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. महेशदादा सोशल फाउंडेशन, जुन्नर यांच्या वतीने भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात सोमवारी (दि.२४ जुलै) हे शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी भारतीय नौदलात तब्बल २५ वर्षे सेवा केलेले निवृत्त कमांडर जयंत एस. कोंडे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराला अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पिंपरी-चिंचवड शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, महेशदादा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल बांगर, उद्योजक कार्तिक लांडगे, रोहिदास गाडे, रमेश गुंड, प्रसाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोंडे म्हणाले की, बी.ई. आणि बी.टेक. साठी अंतिम वर्षात शिकणा-या विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठातील ‘नौदल अधिकारी अभ्यासक्रम-२०१८’ करीता प्रवेश अर्ज करावेत. या अभ्यासक्रमासाठी वेळापत्रकही जाहीर झाले आहे. ३१ जुलै २०१७ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय नौदलातील करिअर पर्याय शोधणे ही एक सुवर्ण संधी आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी नौदलात करिअर करावे, यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणार आहे, असेही यावेळी कोंडे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमर शेळके, विशाल बांगर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अमोल बांगर यांनी केले. सचिन बांगर यांनी आभार मानले.