लखनऊ : बाईकसाठी दोन भावांनी एका मुलाची हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली येथे गेल्या महिन्यात (28 सप्टेंबर घडली. काल (12 नोव्हेंबर) पोलिसांना या घटनेतील आरोपींना पकडण्यात यश आले. विशेष म्हणजे फेसबुकवरुन ओळख करत या दोन आरोपींनी बाईकसाठी 17 वर्षीय लकी वाजपेयीची हत्या केली. दीपक आणि गगन मेहता अशी आरोपींची नावं आहेत.
लकीने नवीन बाईक घेतली होती. त्याबाईकवर या दोन्ही भावांची नजर पडली. ती बाईक मिळवण्यासाठी दीपक आणि गगनने फेसबुकवरुन त्याच्याशी मैत्री केली. मैत्री झाल्यानंतर सहा दिवसांनी या दोघांनी त्याला घरी बोलावले आणि त्याची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर लकीचा मृतदेह त्यांनी एका पेटीत बंद केला. महत्त्वाचे म्हणजे अटक केलेले दोन्ही आरोपींचे वडील रुहेलखंड मेडिकल महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून काम करतात.
दोन्ही भावांनी बाईकसाठी त्याची हत्या केली होती. लकीच्या हत्येनंतर त्यांनी त्याची बाईक घेतली. पण जेव्हा लकीच्या मृतदेहाचा वास येऊ लागल्याने दोघांनी त्याचा मृतदेह दिल्ली-लखनऊ मार्गावरील झाडी झुडपात फेकला. त्यानंतर त्यांनी त्याची बाईक दुसऱ्याला विकली, असं पोलिसांनी सांगितले.
लकी जीआयसीमध्ये 11 वीच्या वर्गात शिकत होता. 28 सप्टेंबरला त्याचे घरचे बाहेर गेले होते. तेव्हा लकीसुद्धा बाईक घेऊन संध्याकाळी परत येईन असं सांगत बाहरे गेला होता. पण तो रात्र झाली तरी न आल्याने कुटुंबियांनी त्याला शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर 30 सप्टेंबरला त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.