पिंपरी- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा आहे. मात्र सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नियोजनशुऩ्य कारभारामुळे शहरवासियांना पाणीकपातीला सामोरे जावे लागते आहे. पाणी समस्यांवर आंदोलन, मोर्चे झाले मात्र अद्यापही समस्या सुटली नाही. शहर काँग्रेसच्या वतीने प्रशासनाच्या निषेधार्थ महापालिकेवर धडक मोर्चा काढला. नही चलेंगी, नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी या घोषणेसह दिवसाआड पाणीकपात रद्द करा, टँकर लॉबी बंद करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
याप्रसंगी शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहरवासियांवर अन्यायकारक दिवसाआड पाणी कपात लादली आहे. पवना धरण पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. पुढच्या वर्षीच्या आक्टोबर पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. तरीही सत्ताधारी भाजप आणि पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणा व नियोजन शून्य कारभारामुळे शहरवासियांवर पाणी कपात लादण्यात आलेली आहे. ही दिवसाआड पाणी कपात तातडीने रद्द करा, पाणी पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले.