‘जेनपॅक्ट इंडिया’ या कंपनीत उपाध्यक्ष पदावर काम कऱणाऱ्या स्वरुप राज यांनी मंगळवारी राहत्या घरी आत्महत्या केली. स्वरुप राज यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्वरुप राज यांनी लैंगिक छळाचे आरोप फेटाळून लावले आहे. ‘मी निर्दोष असून तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवावा’, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.
नोएडातील उच्चभ्रू परिसरात स्वरुप राज त्यांच्या पत्नीसह राहतात. स्वरुप राज हे 2007 पासून जेनपॅक्टमध्ये कामाला होते. प्रोसेस डेव्हलपर म्हणून ते कंपनीत रुजू झाले होते. यानंतर त्यांनी मेहनतीच्या जोरावर बढती घेत उपाध्यक्षपदापर्यंत झेप घेतली.
देशात ‘मी टू’ मोहीम जोर धरु लागल्यावर कंपनीतील दोन महिला कर्मचाऱ्यांनीही राज यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. यानंतर कंपनीने स्वरुप राज यांच्या चौकशीला सुरुवात केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत राज यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.
स्वरुप राज यांनी नोएडातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात ते पत्नीला उद्देशून म्हणतात, ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हेच मी तुला सांगू इच्छितो. माझ्यावर दोन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले. पण खरंच काही केले नाही. मी निर्दोष आहे. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल आणि मी निर्दोष असल्याचे जगाला कळेल. पण तोवर तू आणि कुटुंबीयांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. माझ्यावरील आरोप निराधार आहेत. पण आता हे संपूर्ण प्रकरण जेनपॅक्टमधील सर्वांना माहित आहे. मी या लोकांच्या समोर आता जाऊ शकत नाही. तुझ्या पतीने काहीही चुकीचे काम केले नाही. तू खंबीर राहा आणि तुझं आयुष्य जग. मी आता निर्दोष सुटलो तरी लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच असेल, असे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता तपासाला सुरुवात केली आहे.